Saturday, May 27, 2006

लिफ्ट-यात्रा : एक भयकथा !

मला लहानपणापासूनच लिफ्ट या प्रकाराबाबत एक भिती वाटत आली आहे. कदाचित हा बंद जागेच्या भितीचा सौम्य प्रकार (Mild Claustrophobia) असेल. विशेषत: काळोख्या, सरकारी इमारतीत मी लिफ्ट्चा वापर टाळतोच ! विज गेली आणि बंद पडली तर काय करा? शिवाय या सरकारी लिफ्टस (शासकीय भाषेत उर्ध्व-वाहक की काहिसे) वापराचा परवाना हा महाराष्ट्र राज्य स्थापले गेले त्या काळात मिळालेला असतो. आपण अडकणार आणि नेमक्या त्याच वेळेला ऒळीने ४-५ दिवसांच्या सार्वजनिक सुट्टया यायच्या, दोन - पाच माफक संप व्हायचे आणि आपण तेथेच. त्यापेक्षा जिना बरा. तेथे गुटक्याच्या पिचका-यांची भित्तीचित्तेही पहायला मिळतात. पण मी चकचकीत इमारतीतसुद्धा वॉचमन आणि मोबाइल आहे याची खात्री करूनच लिफ्टमधे प्रवेश करतो.

ही गोष्ट आहे गेल्या ऑगस्ट मधली. मी न्यूयॉर्क राज्यातल्या माझ्या विद्यापीठाच्या गावी पोहोचतच होतो. तिथला एक जुना-जाणता भारतीय विद्यार्थी आम्हाला डाउन टाउन दाखवायला घेऊन गेला. मग घरही दाखवतो म्हणून डाउन टाउनच्या शेवटी असलेल्या एका बकाल भागात तो घेऊन आला. तेथील सगळ्यात पडिक इमारतीत त्याचा अपार्टमेंट होता. त्या इमारतीचे वर्णन निदान मला तरी करता येणार नाही. बाहेरून पाहिले तर तेथे कोणी राह्त असेल असे वाटतही नव्हते. आतही काळोख, काळपट भिंती, लाकडाची जमीन कर् - कर् वाजणारी, काहीशी कुबट हवा अस भयाण वातावरण. तो मित्र म्हणाला की त्या इमारतीमधे धडधाकट असे तो आणि त्याचे रुम-मेट्टस एवढेच. बाकी सगळे म्हातारे-कोतारे, आजारी आणि काहीही काम-धंदा नसलेले राहतात. (Matrix चित्रपट बहुतेक सगळ्यांनी पाहिला असेल. निऒ ऒरॅकलला भेटायला जातो ती इमारत आठवा. त्याहून वाईट ती जागा होती)

तिस-या मजल्यावर जायचे होते. चूक आमचीच होती. ४ जणांच्या लिफ्टमधे ८ जण घुसलो. तिस-या मजल्याचे बटण दाबले. घुईर् - घुईर् असला कसला तरी विचित्र आवाज करत ती लिफ्ट संथपणे वर जायला लागली. 'अमेरिकेतला पहिला लिफ्ट प्रवास' - कोणीतरी पचकला. लिफ्ट वर जात होती पण मला काही तिचे लक्षण काही खरे वाटेन. (कदाचित तो माझा तथाकथित Claustrophobia असेल). पहिला मजला गेला, दुसरा गेला आणि दरवाजा उघडायच्या आतच कोणीतरी open चे बटण दाबले. जोराचा ब्रेक दाबल्यावर येतो तसा आवाज होऊन ती लिफ्ट थांबली. लिफ्ट थांबली पण दरवाजा काही उघडला नाही. परत open चे बटण दाबले पण छे ! लिफ्ट बंद पडली आहे हे लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही.

पहिली चार-पाच मिनिटे मजेत गेली. आरडा-ऒरडा झाला. 'आमच्या लिफ्टस ब-या वगैरे गोष्टी झाल्या. पण मग हळु ह्ळु परिस्थिती लक्षात यायला लागली - 'आपण एका अपरिचित देशातल्या अपरिचित गावातल्या जवळ जवळ वावर नसलेल्या इमारतीतल्या लिफ्टमधे अडकलो आहोत'. सगळी बटणे दाबून पाहिली. काहीही फरक नाही. मग हाताने दरवाजा उघडाचे प्रकार झाले. तो भक्क्म दरवाजा उत्तम दर्जाच्या ऒक लाकडापासून बनवलेला - ढिम्म सुद्धा हलला नाही. मग भिंतीवर थडा-थडा लाथा मारल्या. तो लाकडी सांगाडा तेवढा गदा-गदा हलला. तिथे एक emergency बेल होती. ती दाबली पण कसलाच आवाज होईना. पुन्हा एकदा भिंतीवर थडा-थडा लाथा झाल्या.

त्या मित्राने मोठ्या ऎटीत त्याचा cell phone काढला. पण नशिब पहा - बॅटरी मॄतप्राय झालेली. आत अडकून आता जवळ-जवळ ८-१० मिनिटे होत आली. त्या लिफ्टला Exhaust Fan नव्हता. एवढच काय साधा झरोका पण नव्हता. संपुर्णपणे बंदिस्त असा तो लाकडी डबा होता. आता आतली हवा बाहेर जात नव्हती की बाहेरून आत शुद्ध हवा आत येत नव्हती. जीव गुदमरायला सुरवात झाली. हॅ - हॅ कराणारे पण आता रडकुंडिला आले. काय करावे काही सुचेना. या लाकडी पेटीत आपली जिवंतपणे समाधी हे निश्तित !

आमच्यापैकी एकाकडे भारतातला Mobile Phone होता. प्रवासात बोलता यावे म्हणून त्याने International Roaming घेतले होते. आमच्या सुदैवाने त्यात ४०-५० रुपयांचा charge बाकी होता. प्रयत्न्न केला. घरमालकांना फोन केला. घरमालक स्लोवेनिया की अझरबैझान कुठले तरी स्थलांतरीत होते. माझा मित्र त्याच्या खास Call Center मधे कमावलेल्या अमेरिकन उच्चारात लिफ्ट बंद पडली आहे वगैरे सांगायला लागला. घरमालकांच्या पत्नीने फोन घेतला असावा. तिला काहीच कळेना. तिचे बोलणे आम्हाला कळेना. इकडे charge संपायला येतोय. शेवटी स्पष्ट भारतीय उच्चारात "Elevator is not working and we are in elevator. Please help us" असे सांगीतले. त्यांना ते कळले. We will reach there in 5 minutes हे शब्द कानावर आले असे वाटले.

पुढे काय ? आम्ही विचार करायला लागलो. दुसरे काही हातात नव्हतेच. नेमके काय आठवत नाही पण छताची पट्टी काढावी अशा काही तरी योजना होत्या. यात किती वेळ गेला काही कळलेच नाही. पण निदान कोणीतरी मदतीला येत आहे हा विचार त्या क्षणी तारक ठरला.

तेवढ्यात कुठुन तरी एक अस्पष्टसा आवाज ऎकु आला - "Hello, Anybody there ? " आणि सर्व प्रथम जिवंतपणे बाहेर पडण्याची आशा पल्लवीत झाली. ५ मिनिटात तुम्ही बाहेर याल असा त्या व्यक्तीने धीर दिला. पण आमचे दुर्दैव काही संपले नव्हते. दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न्नात किल्ली Duct मधे पडली. मग दुसरी किल्ली आणली गेली. एकदाचा तो दरवाजा उघडला गेला आणि आम्ही लिफ्टच्या त्या कराल जबड्यातून बाहेर आलो.

बाहेर आलो आणि ऑक्सिजनला 'प्राणवायू' का म्हणतात याची जाणीव झाली. छातीत हवा भरली. घरमालक काकांनी '४ जणांच्या लिफ्टमध्ये ८ जणांनी जावू नये, २ मिनिटे वाट पहावी' वगैरे उपदेश केला आणि आपत्कालीन ९११ फोन केला नाही म्हणून आमचेच आभार मानले. आम्हीही घरमालक काका आणि त्यांच्या सहाय्यकाचे आभार मानले, दिलगिरी व्यक्त केली. घरात येउन घटाघटा पाणी प्यायलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. मग ५ मिनिटांनी (अर्थातच जिन्यानी) खाली आलो. गाडीजवळ आलो तेव्हा कोणीतरी जोक मारला - किल्ली वरच राहिली. २ मिनिटात घेवून येउ. ३ रा मजला आहे पण लिफ्ट आहे. गेल्या ३०-४० मिनीटातला आमच्या मनावरचा ताण, भिती सगळ काही एका हास्यलोटाबरोबर बाहेर आले.
आता लिहिताना गंमत वाटते पण त्या वेळेची आमची बोबडीच वळली होती. त्या नंतर त्या इमारतीत मी ३-४ वेळा गेलो पण कधीही लिफ्ट वापरली नाही. लिफ्ट बद्द्लची माझी भिती खोटी नव्हती एवढे सिद्ध झाले हाच काय तो चांगला भाग !

(सत्यकथा - किंचितही अतिशयोक्ती नाही !)

5 Comments:

Blogger शैलेश श. खांडेकर said...

रोहीत,

खरंच त्या उडणा-या खोलीत अडकणे हा एक भयप्रद अनुभव असतो. रोमांचक लेख, आवडला!

Saturday, May 27, 2006 9:28:00 PM  
Blogger Nandan said...

:). shailesh yanchyashi sahmat.

Saturday, May 27, 2006 11:19:00 PM  
Blogger Parag said...

To good buddy.. jari yaat yatkinchithi atishyokti nasali tarihi je kharach ghadalay te titakech romanchak banawane punarjivit karatana is an art.

Wednesday, May 31, 2006 7:32:00 AM  
Blogger Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

लिफ्टमधे एकदाच अडकले होते. लाइट गेली होती तेव्हा. फकत पाचच मिनिटं पण आम्ही मुलींनी ओरडून किंचाळून आख्खी बिल्डींग डोकयावर घेतली होती. तुमच्यासारखं इतका वेळ अडकलो असतो तार... बापरे! कल्पनाच करवत नाही

Monday, October 26, 2009 5:56:00 AM  
Blogger Nileema said...

Wait anubhaw, amhi nakki kalaji gheu!Thanks! mast watal wachun..

Monday, March 10, 2014 3:29:00 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home