Sunday, July 30, 2006

इथका, NY

इथका - न्यूयॉर्क राज्याच्या उत्तरमध्येला वसलेले एक सर्वांगसुंदर गाव. डोंगरकुसातल्या गावाला निसर्गाने भरभरून तर लाभला आहेच. पण मानवनेही या निसर्गावर दया दाखवून तो अबाधित राखला आहे. हे गाव वसले आहे डोंगरउतारावर. दरीच्या पायथ्याला आहे कयुगा नावाचे विस्तिर्ण सरोवर. इथकाला जर तुम्ही उत्तरेकडून आलात तर रस्ता वळणं वळणं घेत, चढ - उतार करत तुम्हाला छोट्या-छोट्या शेतातून घेऊन येईल. शेतं संपून किर्र झाडी चालु होते. झाडी अचानक संपते आणि समोर येतो कयुगाचा विस्तिर्ण जलाशय. जलाशयाच्या पलिकडे माथ्यावर दिसतो इथकाचा प्राण असलेल्या कॉर्नेल विधापॊठाचा उत्तुंग क्लॉक टॉवर !


कॉर्नेल विद्यापीठ - १८६५ साली स्थापन झालेले, प्रतिष्ठित Ivy League चा सदस्य असलेले, अमेरिकेतल्या सगळ्यात आघाडीतल्या विद्यापीठंपैकी एक. विद्यापीठाचे आवार केवळ विस्तिर्णच नाही तर अवाढव्य आहे. विद्यापीठाच्या बरयाचशा इमारती गॉथिक किंवा व्हिक्टोरियन शैलीतल्या आहेत. विद्यापीठाचे स्वत:चे golf course, botanical garden आणि plantation आहे. डोंगरमाथ्यावरच्या या planatation चा विस्तार आहे फ्क्त २९०० एकर (म्हणजे पुणे विद्यापीठाच्या साधारण ७ पट !)

गावाला नदी वगैरे नाहीच. एक ऒढा मात्र वाह्तो. याचे नाव Fall Creek. अर्धे गाव डोंगरमथ्यावर आणि अर्धे गाव डोंगर-उतारावर असल्यामुळे हा ऒढा रमतगमत तर कधी उड्या मारत वहातो. गावाबाहेर याच्यावर दोन- चार धबधबे बनले आहेत. आजुबाजुची दरी-खोरी अफाट रानांनी भरली आहेत.


मी इथकाला ४ वेळा गेलो. इथकाचे सौदर्य मी Summer, Fall, Winter आणि Spring अशा ४ ही ऋतुत अनुभवले आहे. प्रत्येक ऋतुत इथकाचे रुप वेगळेच भासते. रणरनीत उन्हाळ्यात सारे इथका ऒस पडलेले असते. Fall मधे झाडांच्या पानांचे रंग बदलून लाल, पिवळे, भगवे, जांभळे होतात. विशेषत: कयुगा सरोवाराच्या भोवतालीची दरी तर संपूर्ण रंगेबिरंगी झालेली असते. हिवाळा तर भयानकच. सोसाट्याने वाहणारा वारा हिमकणांचे नुसते वार करत असतो. कुठे हिरवळीचे पातेसुद्धा दिसत नाही. हिवाळ्याचे वर्णन केवळ "भीषण सुंदर" या एकाच शब्दाने करता येईल. ४ महिने हा अनुभव घेतल्यावर मग Spring येतो. पुन्हा गवत दिसायला लागते. झाडांना परत पालवी फुटते. पुन्हा एकदा उत्साहाला उधाण येते.

डाउन-टाऊन मध्ये Ithaca Commons नावाचा एक छानदार ओपन मॉल आहे. दोनही बाजुला त-हेत-हेच्या वस्तु विकणारी छोटी-छोटी दुकाने, विविध प्रकारची उपहारग्रुहे आणि मधे एक चांगली रुंद फरसबंदी केलेली जागा. संध्याकाळच्या वेळेला गप्पा छाटायला किंवा वेळ घालवायला एक उत्तम जागा. या बाजारात कायम कोणते तरी Festivals चालु असतात. एकदा सफरचंदाचे विविध पदार्थ आणि वस्तु केलेला Apple Festival आठवतो.

या गावाला एक प्रकारचा घरंदाजपणा आहे. कुठे जरासाही बकालपणा नाही. पण उगचच चमचमाट, लखलखाट किंवा बडेजावही नाही. छोटी-छोटी टुमदार घरे, दुतर्फा गर्द झाडी असलेले वळणावळणाचे रस्ते, Fall Creek वरचे चिमुकले पुल. एखाद्या परिकथेत शोभावे असे गाव. रात्रीच्या वेळी जेव्हा सर्वत्र सामसुम होते तेव्हा घरांभोवतीची विचित्र सजावट, झाडांच्या सावल्या, आणि निरव शांतता यामुळे हेच गाव अतिशय गुढ-रम्यही वाटते.

गावातले रहिवासी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ! त्यातही आंतराष्टीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय. भारतीय, चायनीज, कोरियन, क्युबन, थाई अशा उपहारग्रुहांची रेलचेल आहे. आणि कदाचित यामुळेच गावातले वातावरण बरेचसे उदारमतवादी आहे. या उदारमतवादाची झलक इथकाच्या भिंतींवर, व्रुत्तपत्रांतून आणि लोकांशी बोलताना सारखी जाणवते. किंबहुना अमेरिकेतील सर्वात उदारमतवादी गावात इथकाची गणना होते. इथकाकरांच्या विरोधामुळेच इथकातून Highway नेण्याची योजना बासनात गुंडाळावी लागली. गेली काही वर्षे इथकावासी WalMart विरुध्द लढा देत आहेत. जागरुक रहिवासी आणि उदारमतवादी वातावारण यामुळे इथकाला अमेरिकेतील "Most Enlightened Town" असा बहुमान प्राप्त झाला आहे.

मी गेल्या वर्षभरात इथकाला जवळ जवळ एक-दीड महिना राहिलो आहे. प्रत्येक सुट्टीत ताईने केलेल्या भजांवर किंवा राहुलनी केलेल्या Chicken Wings वर आडवा हात मारत, ध्रुवशी खेळताना दिवस कसा जातो ते कळतही नाही.

इथका हे मी अमेरिकेतले पाहिलेले पहिले गाव आणि आत्तापर्यंत सगळ्यात आवडलेले पण!



(कयुगा सरोवर - उन्हाळ्यातील एक आळसावलेली संध्याकाळ)






(कॉर्नेलमधला सेज हॉल - बाहेरून किल्लेवजा दिसणारी ही वास्तु आतून पूर्णपणे अधुनीक आहे. )